2019 हे वर्ष चहाची सोनेरी पहाट घेऊन उगवले. त्या वर्षात एका प्रसिद्ध चहाच्या फ्रॅंचायझी चा नुसता धुमाकूळ सुरू होता. उद्योजक बनू इच्छिणारे आणि सबळ भांडवल गाठीशी असणाऱ्या अनेक लोकांनी ह्या चहाच्या नव्या अवतारावर उड्या घेतल्या. जागोजागी मोक्याच्या लोकेशन्स वर चकाचक आऊटलेट्स सुरू झाल्या. 10 रुपयांचा चहा सुद्धा एवढ्या आकर्षक पध्दतीने विकता येतो हे, सगळ्यांना समजले आणि मग त्या प्रसिद्ध चहा च्या प्रमाणे अमृततुल्य सुरू करण्याचा अक्षरशः ऊत सुरू झाला आणि गावोगावी तरुणांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने, त्यांना झेपेल आणि जमेल असे भांडवल टाकून त्याच पद्धतीचे अमृततुल्य सुरू केले. सगळ्यांनाच किती रिस्पॉन्स भेटला हा संशोधनाचा विषय..!!
पण एक गोष्ट मात्र प्रत्येकजण कबूल करेल की, आत्ता अमृततुल्यची क्रेझ कमी झाली आहे. लॉकडाऊन मध्ये बरेच अमृततुल्य बंद देखील पडले आणि नव्याने अमृततुल्य सुरू होण्याच्या वेग मंदावला आहे.
जी गोष्ट अमृततुल्यची तीच मिसळची..!! मी जिथे राहतो त्या पिंपरी चिंचवड परिसरात तर , मिसळ ची प्रचंड क्रेझ आहे.
गेल्या 15-20 वर्षांपासून पुण्याच्या-पिंपरी चिंचवडच्या अनेक प्रसिद्ध मिसळ व्यावसायिकांनी आपली चव आणि गुणवत्ता टिकवून ठेवून व्यवसायात आपला जम बसवला.
ह्याच मिसळमध्ये पैसे दिसायला लागल्यावर अनेक नव्या उद्योजकांनी मिसळ चे नवीन कितीतरी प्रकार ह्या मागच्या 2 वर्षात सुरू केले.
सुरुवातीचा रिस्पॉन्स वगळता त्यांना कितपत यश आले ??
हा भाग निराळा..!!, पण एखाद्या रोलर कोस्टर राईड सारखी ह्या नवीन व्यवसायांची गत झाली ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे.
(रोलर कोस्टर राईड म्हणजे केवळ एकदा चव चाखून परत आलेले लोकं त्यातील बहुसंख्य लोकं परत गेले असतील अशी शक्यता दुरापास्त). मुळात असे का होते?? धुमधडाक्यात सुरू झालेला व्यवसाय अल्पावधीतच बंद का पडतो?? किंवा त्याचा रिस्पॉन्स कमी का होतो ?? ह्याचा शोध घेणे गरजेचे आहे!! मुंबईमध्ये 2014 मध्ये चेंबूर ते वडाळा दरम्यान सुरू झालेली मोनोरेल हे वरील सर्व गोष्टींचे उत्तम उदाहरण ठरावे.
मर्यादित प्रवासी क्षमता, अनावश्यक मार्गाचे केलेले नियोजन आणि महाग आणि अव्यवहार्य तंत्रज्ञान आणि सर्वात मुख्य म्हणजे उपनगरीय रेल्वे स्थानकांपासून लांब अंतर ह्या गोष्टींचा फटका 2500 कोटी खर्चून सुरू झालेल्या मोनोरेल प्रकल्पाला बसला. आणि मोनोरेल केवळ एक जॉय राईड किंवा रोलर कोस्टर राईड बनून राहिली आणि नंतर ती बंदच पडली. त्याचप्रमाणे केवळ एका प्रतिष्ठीत ब्रँड ची कॉपी करून किंवा सर्वसामान्य मार्केटचा अंदाज न घेता केवळ नवीन प्रयोग ह्या गोंडस नावाने सुरू झालेले आणि भरभक्कम भांडवल टाकून सुरू केलेले व्यवसाय हे मुंबईच्या मोनोरेल सारखे बनून राहतात.
मुळात एखादी फ्रेंचायझी घ्यावी किंवा घेऊ नये ह्या वादात मला पडायचे नाही . पण केवळ एखाद्या प्रतिष्ठित ब्रँड ची कॉपी डोक्यात ठेवून त्याच पद्धतीने आपला व्यवसाय सुरू करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी आणि उद्योजकांसाठी मला हा इशारा द्यायचा आहे .त्यासाठी हा लेखप्रपंच ..!!
मुळात सर्व नामांकित आणि प्रसिद्ध ब्रँड हे त्यांच्या 20-25 वर्षांच्या मेहनतीने आणि चिकाटीने आणि गुणवत्तापूर्ण सेवांमुळे मार्केटमध्ये टिकून आहेत . त्यामुळे कोणताही नवीन व्यवसाय सुरू करताना आपला व्यवसाय रोलर कोस्टर / जॉय राईड बनता कामा नये आणि त्याचबरोबर स्वतःची मूळ ओळख गमावता कामा नये ह्या गोष्टी प्राध्यानाने प्रत्येक युवकाने ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे . त्यामुळे , ट्रेंड फॉलोअर्स बनून राहण्यापेक्षा ट्रेंड सेटर बनून राहणे जास्त महत्वाचे आहे . कारण त्यात उशीर लागेल पण जे हाताशी येईल ते पुढील अनेक पिढ्यांचे कल्याण करून देईल एवढी माझी ठाम खात्री ...!!
.....✍️ निखिल सुभाष थोरवे
मो. 9764796699
व्यवसायातील नवीन संकल्पना याबद्दल चर्चा करण्यासाठी जरूर कॉल करा
FourClaps Digital Media Consultancy